- January 10, 2025
- No Comment
बिल्डरच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी व ५ लाख रुपये दंड
पुणे: गणपती उत्सवानिमित्त वर्गणी गोळा करण्यावरून दोन सख्ख्या भावांनी बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व ५ लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.
जिवन सुरेश पवार (वय २०, रा. मिकोबा मोरे चाळ, सद्गुरू कृपा हाईट्स, उत्तमनगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. चंद्रकांत रामचंद्र मोरे (वय ४४, प्रचिती अपार्टमेंट फ्लॅट नं. ०४, कीर्तीनगर, वडगाव) हे आरोपींच्या हल्ल्यात जखमी झाले होते. या प्रकरणी मोरे यांनी उत्तमनगर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी जीवन पवार व त्याच्या अल्पवयीन भावावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले.
त्यांना उत्तमनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदरे, पोलीस निरीक्षक अर्जुन गोविंद बोत्रे, महिला सहायक पोलीस निरीक्षक चवरे, पोलीस हवालदार विनायक करंजावणे व महिला पोलीस अंमलदार प्रियांका रासकर यांनी या खटल्यात मदत केली. ही घटना शिवणे परिसरात एक सप्टेंबर २०२० ला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. मोरे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा शिवणे परिसरात एक प्रकल्प सुरू आहे.
त्याच भागातील अखिल मोरेनगर मित्र मंडळाची मुले गणपती उत्सवासाठी वर्गणी मागण्यासाठी आली होती. वर्गणीच्या कारणावरून फिर्यादी व आरोपींची शाब्दिक बाचाबाची झाली होती. दरम्यान, वर्गणीच्या झालेल्या वादातून आरोपींनी कुऱ्हाड व दगडाने मोरे यांना मारहाण केली. या मारहाणीत मोरे हे गंभीर जखमी झाले होते.