- January 12, 2025
- No Comment
इमारतीच्या टेरेसवर व्यसन करण्यास अटकाव; दोघा भावांना बेदम मारहाण
कॅम्प (पुणे): इमारतीच्या टेरेसवर मित्रांना घेऊन मद्यपान आणि धूमपान करणाऱ्या भावांना विरोध करणाऱ्या इमारतीच्या सेक्रेटरीला आणि त्याच्या भावाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगर कॅम्प 1 मधील बेवस चौक येथे खेमदास अपार्टमेंट आहे. या इमारतीच्या 301 क्रमांकाच्या सदनिकेत संतोष चव्हाण हे राहतात.
त्यांची मुलं शुभम चव्हाण आणि श्रेयस चव्हाण हे त्यांच्या मित्रांना घेऊन येऊन इमारतीच्या टेरेसवर धिंगाणा घालत धूम्रपान आणि मद्यपान करतात, असा इमारतीच्या रहिवाशांचा आरोप आहे. त्यामुळे इमारतीचे सेक्रेटरी पवन सेवानी आणि इतर सदस्य हे चव्हाण कुटुंबाकडे टेरेसची चावी मागण्यासाठी गेले. तेव्हा शुभम चव्हाण याने आम्ही चावी देणार नाही, ही बिल्डिंग कोणाच्या बापाची नाही, काय करायचे ते करून घ्या अशी भाषा वापरली.
त्यानंतर झालेल्या वादात संतोष चव्हाण, शुभम चव्हाण, श्रेयस चव्हाण यांनी पवन सेवानी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कपाळावर धारदार शस्त्राने मारून त्यांना जखमी केले. तसेच भावाला वाचवायला गेलेल्या सनी सेवानी याच्या गालावरही धारदार वस्तूने वार केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पंकज त्रिलोकाणी यांनी जखमींना मदत केली आणि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी सुभम चव्हाण, संतोष चव्हाण, श्रेयस चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.