- January 14, 2025
- No Comment
शादी डॉट कॉमवर नोंदणी करत चक्क 25 महिलांची फसवणूक ! आरोपी फिरोज निजाम शेख गजाआड
पुणे: शादी डॉट कॉमच्या माध्यमातून एकाने २५ हुन अधिक महिलांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. फिरोज निजाम शेख ( वय-३२, सध्या रा.मिठानगर, कोंढवा, पुणे, मूळ रा. गंगावळण , कळाशी, ता. इंदापूर, जि -पुणे) याला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवार (दि.१२) पुण्यातून अटक केली आहे. त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याने घटस्फोटित, विधवा महिलांना टार्गेट करत त्यांची फसवणूक केल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील एका घटस्फोटित महिलेने शादी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. त्यावरून तिचा मोबाईल नंबर मिळवून फिरोज शेखने लग्न करण्याची तयारी दर्शवली. महिलेच्या घरी येऊन त्याने इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितले. त्यानंतर ओळख वाढवून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून १ लाख ६९ हजार रुपयांची रोकड आणि ८ लाख २५ हजारांचे दागिने उकळले.
लग्नाचा तगादा सुरू होताच त्याने ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने १० जानेवारीला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कोल्हापूरच्या पोलिस पथकाने पुण्यातील कोंढवा येथून संशयिताला अटक केली. त्याचे एक लग्न झाले असून, कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत.
पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने २५ महिलांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. यातील काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळले आहेत. यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून काही ठिकाणी तक्रारी अर्ज आहेत.