- January 17, 2025
- No Comment
मंगळवार आणि रास्ता पेठेतील बेकायदा पथविक्रेत्यांवर कारवाई

पुणे: महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने आज शहराच्या मध्यवर्ती कसबा – विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत असलेल्या मंगळवार पेठ परिसर, बारणे रस्ता, पारगे चौक, खड्डा गॅरेज परिसर, रास्ता पेठ आणि केईएम हॉस्पीटल परिसरातील पदपथावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांचे साहित्य जप्त केले.
तर शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, जोगेश्वरी मंदिर रस्ता आणि कुमठेकर रस्ता परिसरात पदपथावर अनधिकृत व्यावसायीकांनी अतिक्रमण करू नये यासाठी गस्त वाढविण्यात आली.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने नुकतेच महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेउन रस्ते आणि पदपथ अतिक्रमण मुक्त करा आदेश प्रशासनाला दिले. अतिक्रमण कारवाई रोखण्यास कोणी दबाव टाकला तरी कारवाई सुरूच ठेवा असे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मागील काही दिवसांत शहराच्या विविध भागांमध्ये अतिक्रमण कारवाईचा धडाका लावला आहे. आज कसबा विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने मध्यवर्ती शहरातील मंगळवार पेठ आणि रास्ता पेठेतील अतिक्रमणांवर जोरदार कारवाई केली. या कारवाईत तीन मोठे ट्रक भरून पथविक्रेते व अन्य व्यावसायीकांचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. १३ जानेवारीपासून अतिक्रमण विभागाने परवानाधारक व्यावसायीकांकडून तब्बल ३१ लाख रुपये थकित परवाना शुल्कही वसुल केले आहे.
मध्यवर्ती शहरातील अतिक्रमण निर्मुलनासाठी कसबा विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली. मुख्य बाजारपेठेतील लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, जोेगेश्वरी मंदिर परिसरातील रस्त्यांवर आणि पदपथांवर अतिक्रमण होउ नये, यासाठी गस्त वाढविण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.




