- January 17, 2025
- No Comment
नोकरी लावण्याचे आमिष देऊन साडेसोळा लाखांची फसवणुक; चौघांवर गुन्हा दाखल

पुणे: कोल इंडिया कंपनीमध्ये अधिकारी पदावर नोकरी लावतो असे सांगून १६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत खडकीतील एका ५५ वर्षाच्या वडिलांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तुषार धनंजय कारखानीस (वय ३०), धनंजय लक्ष्मण कारखानीस (वय ६०), नुतन कारखानीस व रोहित कारखानीस (सर्व रा. कॉर्टर नं. ५, डेपो बटालियन बी ई जी अँड सेंटर, इस्ट सॉपर्स, खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खडकीतील बी ई जी अँड सेंटर येथील डेपो बटालियन येथे ऑक्टोंबर २०२१ ते १० एप्रिल २०२३ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला कोल इंडिया कंपनीमध्ये अधिकारी पदावर नोकरी लावतो, त्या करीता १६ लाख रुपये देण्यास सांगितले. नोकरी न लागल्यास सर्व पैसे परत देऊ, असे आश्वासन देऊन विश्वास संपादन केला. मुलाला नोकरी मिळेल, या आशेवर त्यांनी १६ लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांनी कोल इंडिया कंपनीचे मेडिकलसाठीचे बनावट पत्र व विमानाची बनावट तिकीटे देऊन फिर्यादीची दिशाभूल केली. फिर्यादी यांनी वेळोवेळी पैसे परत मागितल्यावर त्यांनी अद्याप पैसे परत न करता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.




