- January 19, 2025
- No Comment
मुंढव्यातील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची धडक कारवाई; हॉटेल मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंढवा: मुंढवा येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी हुक्का पात्र तसेच सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक मुंढव्यात गस्त घालत होते, या परिसरातील एका हॉटेलात बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख यांना एका बातमीदाराकडून मिळाली. मिळालेल्या महितीनुसार पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकत कारवाई केली.
या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या हॉटेलमधून हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) सन १९१८ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, पृथ्वीराज पांडुळे, शुभांगी म्हाळशीकर, संजयकुमार दळवी यांनी केली.




