- January 22, 2025
- No Comment
धक्कादायक!स्वारगेट पोलिसांनी अटक केलेल्या बांगलादेशीकडे बनावट कागदपत्रांचा ढीग

स्वारगेट: स्वारगेट पोलिसांनी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोराकडून बनावट कागदपत्रांचा ढीग जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून ८ पॅनकार्ड, १५ आधारकार्ड, २ मतदान कार्ड, २ ड्रायव्हिंग लायसन्स, ३ पासपोर्ट, ९ डेबिट कार्ड, ८ क्रेडिट कार्ड, उद्योग आधार-शॉप अॅक्ट आदी ७ व्यावसायिक कागदपत्रे, शाळा सोडल्याचे ३ दाखले, जन्माचे ८ दाखले अशी अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली.
यासोबतच आरोपीकडून पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवैत, कतार, यूएई आणि मलेशिया या देशांच्या चलनी नोटादेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रे त्याच्याकडे आढळल्याने पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत. घुसखोरांना अशा प्रकारची कागदपत्रे तयार करून देऊन देशाच्या सुरक्षेसोबत खेळ करणाऱ्या आरोपींच्यादेखील मुसक्या आवळल्या जाणार आहेत.
एहसान हाफिज शेख (वय ३४, रा. महर्षिनगर, झांबरे पॅलेस, स्वारगेट) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार सोमनाथ दादा ढगे (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. ढगे हे जुलै २०२४ पासून स्वारगेट पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकामध्ये नेमणुकीस आहेत. पतित पावन संघटना, क्रांतिवीर सेना, सकल हिंदू समाज आदी विविध संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शेख याला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. तसेच, तो बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर, आरोपी शेख याच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली. त्यावेळी मसरूर शेख नावाच्या व्यक्तीच्या होलसेल कापडाच्या व्यवसायात काम केले. त्यानंतर स्वतःचा ‘ए. एस. एन्टरप्राईजेस’ नावाचा होलसेल टी-शर्टचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. ही जागा इमान इक्बाल शेख यांच्या मालकीची आहे.
पोलिसांनी शेख याला भारतीय नागरिक असल्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले होते. त्याने आधारकार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, भाडेकरार पोलिसांकडे सादर केले. ही सर्व कागदपत्रे त्याने भाडेकराराच्या आधारे काढलेली होती. त्याच्याकडे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, त्याचे पालक भारतीय निवासी असल्याबाबतचे पुरावे नव्हते. पोलिसांनी चौकशीदरम्यान त्याचा मोबाईल जप्त केला. त्यामध्ये ‘आर. जी. कार मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, कोलकाता’चे त्याच्या नावाचे जन्म प्रमाणपत्र मिळाले. त्याच्या पालकांचा खोटा पत्ता पश्चिम बंगालमधील उत्तर परगणा येथील दर्शविण्यात आलेला होता. तसेच, मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये बांगलादेशच्या कॉलिंग कोडसह अहद मामा, आकास बरी, अक्रामूल, अलमीन रोपसी आदी नावाने नंबर मिळून आले.
त्याच्या मोबाईलमध्ये ‘आयएमओ’सारखे आंतरराष्ट्रीय फ्री व्हीडीओ कॉल करण्याचे अॅपदेखील सापडले. चौकशीत त्याने हे सर्व त्याचे नातेवाईक असल्याचे सांगितले. तसेच ते बांगलादेश येथे राहात असल्याची कबुली दिली. त्याचे जन्माचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे कबूल केले. त्या आधारे भाडेकरारनामा केला. भाडेकराराच्या आधारे भारत देशाचा पासपोर्ट काढला.




