- January 23, 2025
- No Comment
बीटी कवडे रोड येथे कोयता गँगची दहशत; पन्नास वाहनांची तोडफोड, टोळकी गजाआड

बीटी कवडे रोड (पुणे): बी. टी. कवडे रोड येथे कोयता गँगची दहशत निर्माण करण्यासाठी पन्नास वाहनांची तोडफोड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने चार चाकी वाहने, बस, टेम्पो, रिक्षा आणि तीन ते चार दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच एका हॉटेलमध्ये जाऊन टेबलवर कोयत्याने वार करून हॉटेलचे नुकसान केले आहे.
रात्री साडे आठ वाजता गजबलेल्या बी. टी. कवडे रस्त्यावर दोन मुले हातात कोयता घेऊन फिरत होते. दिसेल त्या वाहनांवर वार करत चालत होते. ससाणे उद्यान ते बी. टी. कवडे रस्ता येथे हे कृत्य केले आहे. एका चायनिय गाडीवर वार करून हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर बसेरा कॉलनीत त्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या सर्व वाहनांवर वार करून काचा फोडल्या.
वाहने फोडताना काही नागरिकांनी अडवले तर त्यांना कोयता दाखवून धमकी दिली. त्यावेळी काही दुकानदार पकडण्यासाठी मागे धावले, त्यावेळी ते निगडे नगर येथील रिक्षात लपून बसले होते. त्याची खबर मिळताच दहा ते पंधरा नागरिकांनी एकत्र येऊन त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी या प्रकरणात कौशल लांडगे (वय-२०, रा. भीमनगर) याला ताब्यात घेतले असून एक अल्पवयीन आरोपी ही ताब्यात घेतला आहे.
आरोपीने नशा केली होती. यामध्ये त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले असून त्यांना ताब्यात घेतले आहे.
नीलकंठ जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा ठाणे