- January 23, 2025
- No Comment
पोलीस असल्याच सांगत महिलेचे 6 लाखांचे दागिने केले लंपास; सिंहगड रोडवरील वडगाव पुलाजवळील धक्कादायक घटना

सिंहगड रोड: पोलीस असल्याचा बहाणा करुन महिलांच्या दागिने चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे काम करीत असल्याचे भासवून हातचलाखी करुन महिलेच्या पर्समधील ६ लाख रुपयांचे दागिने दोघा चोरट्यांनी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत हिंगणे येथील एका ५६ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अंदाजे ५० व ४० वर्षाच्या दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सिंहगड रोडवरील वडगाव पुलाजवळील शौर्यश्री बँक्वेट हॉलच्या समोर बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पायी जात असताना दोघे जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगितले. महिलांचे दागिने चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे काम करीत असल्याचे भासविले. फिर्यादी यांच्या गळ्यातील व हातातील ६ लाख रुपयांचे दागिने पर्समध्ये ठेवायला सांगितले. त्यांनी हे दागिने काढून पर्समध्ये ठेवले. पर्समध्ये दागिने व्यवस्थित ठेवले आहे का, असा पाहण्याचा बहाणा करुन त्यांनी हातचलाखी करुन पर्समधील ६ लाखांचे दागिने चोरले. दुचाकीवरुन ते नवले पुलाच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर फिर्यादी यांनी पर्समध्ये पाहिले तर दागिने आढळून आले नाहीत.
पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करीत आहेत.




