- January 23, 2025
- No Comment
चिंताजनक! पुण्यात “जीबीएस’ रुग्णांची संख्या ५९ वर

पुणे: शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या मेंदूविषयक आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या ५९ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण किरकटवाडी, धायरी, सिंहगड रस्ता या परिसरातील आहेत. ‘जीबीएस’ स्थितीचा अभ्यास आणि विश्लेषणासाठी स्थापन करण्यात आलेले शीघ्र कृती दल अलर्ट मोडवर आले आहे.
दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याचे नमुने महापालिकेने संकलित करण्याला सुरुवात केली आहे.
शहरात मंगळवारी ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’चा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, शीघ्र कृती दलातील तज्ज्ञ, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी यांची तातडीची बैठक पार पडली. त्यात परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसरामधून पाण्याचे आणि अन्नाचे नमुने संकलित केले जात आहेत. रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबियांची तपासणी, वैद्यकीय पार्श्वभूमी ही माहितीही गोळा केली जात आहे. खासगी रुग्णालयांबरोबर आज बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, औषधे आणि उपचार सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– डॉ. बबिता कमलापूरकर, सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग
रुग्णांची माहिती :
– एकूण ५९ रुग्ण
– ३८ पुरुष आणि २१ महिला.
– ३३ रुग्ण पुणे ग्रामीणमध्ये.
– ११ रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील.
– १२ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील.
– ३ रुग्ण इतर जिल्ह्यांमधील
– १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर
रुग्णांची वयोगटानुसार माहिती :
वयोगट – पुरुष – महिला
०-९ – ७ – ४
१० – १९ – ८ – ४
२० -२९ – ६ – १
३० – ३९ – ५ – ३
४० – ४९ – ५ – ३
५० – ५९ – ५ – २
६० – ६९ – ४ – ३
७० – ८० -० – १
एकूण – ३८ – २१




