- January 23, 2025
- No Comment
पिंपळे गुरवच्या तोतया पोलिस अधिकाऱ्याला अटक, सांगवी पोलिसांची कामगिरी

पिंपळे गुरव: पोलिस अधिकारी नसताना अधिकाऱ्याचा गणवेश घालून मुलाला पोलिस ठाणे दाखवण्यासाठी तोतया गेला, मात्र त्याच्या संशयित हालचाली पोलिसांच्या नजरेतून सुटल्या नाही. तो पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करताना सांगवी पोलिसांनी अटक केली.
ही कारवाई मंगळवारी (दि. २१) सायंकाळी चारच्या सुमारास करण्यात आली. संतोष विजयकुमार लांडगे (वय ३९, रा. पिंपळे गुरव), असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार राजेंद्र शिरसाठ यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष लांडगे खासगी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मात्र, पोलिस अधिकारी नसताना त्याने तोतयागिरी करून खाकी रंगाचा गणवेश परिधान केला. त्यावर पोलिस अधिकाऱ्याप्रमाणे स्टार, लाल-निळी फीत, लोगो, नावाची पाटी, लिनियार्ड, कमरेला ब्राऊन रंगाचा बेल्ट आणि त्यावर ‘महाराष्ट्र पोलिस सेवा’ असा लोगो लावला. स्वतःचा फोटो असलेले मुंबई पोलिस दलाचे बनावट ओळखपत्रही तयार केले होते.
दरम्यान, मुलाला पोलिस ठाणे दाखवण्यासाठी तो मंगळवारी पोलिस अधिकारी बनून सांगवी पोलिस ठाण्यात गेला. मात्र, प्रत्येक अधिकाऱ्याचा गणवेश वेगळा असतो. त्याने परिधान केलेला गणवेश सहायक पोलिस निरीक्षकाचा होता. मात्र, नावाची पाटी पोलिस उपनिरीक्षकाची लावली. खांद्यावर दोनऐवजी सहायक पोलिस निरीक्षकाचे तीन स्टार लावले. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्याचे बिंग फुटले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याने बोगस पोलिस अधिकारी बनवून फसवणूक केल्याची शक्यता आहे.




