- January 24, 2025
- No Comment
लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; तुमचे पैसे आले की नाही असे तपासा
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने २६ जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार, आता महिलांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या देखील खात्यात पैसे आले की नाही हे पुढे दिलेल्या पद्धतीनुसार तपासून घ्या.
पैसे जमा झाले की नाही असे तपासा:
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यावर संबंधित महिलांना बँकेकडून मेसेज येईल. जर कोणाला मेसेज आला नसेल, तर महिलांनी आपल्या बँकेच्या मोबाईल अॅपद्वारे किंवा थेट बँकेत जाऊन खात्याची स्थिती तपासू घ्यावी. बँकेच्या अॅपमध्ये “अकाउंट डिटेल्स” विभागात जाऊन शिल्लक रक्कम पाहता येईल.
दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आश्वासन दिले होते की, जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपर्यंत सर्वांच्या खात्यात जमा केला जाईल. मागील महिन्यातही हप्ता शेवटच्या आठवड्यातच जमा करण्यात आला होता. तसेच, ज्या महिला योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून हप्त्याची रक्कम वसूल करण्यात येणार नाही, असे देखील तटकरे यांनी सांगितले होते. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला होता.
महत्वाचे म्हणजे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात असले तरी, पुढील काळात हा हप्ता २१०० रुपये करण्यात येईल, असे सरकारकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अजूनही सरकारकडून हप्त्याची रक्कम वाढवण्यात आलेली नाही. तसेच, अर्थमंत्रालयाकडे देखील यासंदर्भात शिफारस करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना 1500 रुपयांवर समाधान मानावे लागणार आहे.