- January 25, 2025
- No Comment
महाविद्यालयीन तरुणांकडून अंमली पदार्थांची तस्करी, कोरेगाव पार्कमधून 67 लाखांचा तर लोणी काळभोरमधून 16 लाखांचा गांजा, कोकेन जप्त

पुणे: कॅम्पमधील चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. कोरेगाव पार्क, बंडगार्डन सारख्या पॉश एरियात राहणारे, महागडे आयफोन घेऊन वडिलांच्या महागड्या गाड्यातून फिरायचे.
बारावीनंतर शिक्षण सुटले. अन ते अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकले. पण, पोलिसांची गाडी पाहून बावरले आणि गाडीतून पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी कोकेन, गांजा, मिनी कुपर व ग्रँड व्हीटारा अशा दोन महागड्या कार असा ६७ लाख ८ हजार १०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
प्रणव नवीन रामनानी (वय १९, रा. बंडगार्डन) आणि गौरव मनोज दोडेजा (वय १९, रा. कोरेगाव पार्क) अशी या दोघांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक २३ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक उल्हास कदम व त्यांचे सहकारी कोरेगाव पार्क परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना मिळालेल्या बातमीवरुन क्लोअर गार्डन सोसायटीत दोघा तरुणांना पकडले. त्यांच्याकडे १३ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा १३६ ग्रॅम ओजी कुश (हायड्रोपोनिक) गांजा हा अंमली पदार्थ ६९ हजार ५०० रुपयांचा २ ग्रॅम ७८ मिलीग्रॅम कोकेन, २ लाख ७० हजार रुपयांचे ४ मोबाईल फोन, ५० लाख रुपयांच्या दोन कार व इतर वस्तू असा ६७ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
दुसरी कारवाई:
लोणी काळभोर: लोणी काळभोर मध्येअंमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोरमध्ये दुसरी कारवाई केली. पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेल्या बातमीवरुन लोणकर वस्ती, येथील सार्वजनिक रोडवर भरतकुमार दानाजी राजपुरोहित (वय ३५) आणि आशुसिंग गुमानसिंग (दोघे रा. जि. जालोर, राजस्थान) यांच्या ताब्यातून १६ लाख ६७ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यामध्ये ४० किलो ३९०ग्रॅम गांजाचा समावेश आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, अनिल जाधव, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, योगेश मांढरे, युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, आझाद पाटील, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, सुनिल नागलोट, प्रदिप गाडे, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, सचिन माळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, विनायक साळवे, योगेश मोहिते, रेहाना शेख, नुतन वारे यांनी केली आहे.