- January 29, 2025
- No Comment
केलेल्या गुंतवणुकीवर नफा मिळाल्याचे खोट्या अभिलेखाद्वारे दाखवत शिक्षकाला ४ लाखांचा गंडा

पिंपरी : गुंतवणुकीसाठी शिक्षकाकडून चार लाख रुपये घेतले. त्याने केलेल्या गुंतवणुकीवर नफा मिळाल्याचे खोट्या अभिलेखाद्वारे दाखवण्यात आले. शिक्षकाने झालेला नफा अथवा गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्याची फसवणूक केली. पिंपरी येथील संत तुकारामनगर येथे १० जून २०२४ ते ९ जुलै २०२४ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी २७ जानेवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल केला.
पिंपरी येथील संत तुकारामनगरमधील ३८ वर्षीय शिक्षकाने याप्रकरणी सोमवारी (दि. २७) संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित महिला लाईडिया शर्मा, राहुल कपूर आणि एका बँक खाते धारकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिला लाईडिया आणि राहुल यांनी फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांना एका व्हाट्स ॲप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. तिथे त्यांना एका ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन करून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनी चार लाख रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीवर ७० हजार रुपये नफा झाल्याचे संशयितांनी खोटा अभिलेख तयार केला. फिर्यादी यांनी नफा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ती रक्कम काढता आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार तपास करीत आहेत.