- January 29, 2025
- No Comment
पुण्यातील हडपसरमधील धक्कादायक प्रकार वैद्यकीय प्रवेश देण्याच्या आमिषाने पुण्यातील एका व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक

एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचं आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका मगरपट्टा सिटीमध्ये राहणाऱ्या 49 वर्षांच्या व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुमच्या मुलीला मेडिकलला अॅडमिशन करून देतो, फक्त 40 लाख द्या, असं म्हणत आरोपींनी व्यावसायिकांची फसवणूक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. सुनील कुमार (वय ४५), सौरभ गुप्ता (वय ४०), विकास गुप्ता (वय २८), रणधीर सिंग (वय ३०), प्रियांका मिश्रा (वय २५) अशी संशयितांची नावे आहेत. मागील ऑगस्ट महिन्यात त्यांची एका व्यक्तीमार्फत आरोपींची ओळख झाली होती. आरोपींनी त्यांना मुलीला खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखविलं. आपली ओळख आहे, अॅडमिशन होऊन जाईल, असं व्यावसायिकाला सांगितलं गेलं. लेकीसाठी व्यावसायिकाने देखील 40 लाख देण्यासाठी पुढाकार घेतला
दरम्यान, व्यावसायिकाकडून रोख आणि ऑनलाइन स्वरूपात 60 लाख रुपये घेतले. परंतु प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. त्यावर आरोपींनी 20 लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित 40 लाख रुपये न देता फसवणूक केली, अशी माहिती फिर्यादीने दिली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरू केलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत