- January 30, 2025
- No Comment
मोक्का गुन्ह्यात 5 महिन्यांपासून फरार 03 आरोपी जेरबंद

पुणे : मोक्का गुन्ह्यात गेल्या ५ महिन्यांपासून फरार असलेल्या तिघा गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाला यश आले आहे. अमन राजेंद्र डोके (वय १९, रा. राजीव गांधीनगर, खडकी), किरण अनिल खुडे (वय २३), दीपक राजेंद्र डोके (वय २३, रा. राजीव गांधीनगर, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.
याबाबत हिना ऊर्फ रिना फकिरा तायडे (वय २८, रा. महादेववाडी, खडकी बाजार) यांनी खडकी पोलीस ठाण्यात १८ सप्टेंबर २०२४ रोजी फिर्याद दिली होती. शुभम उमाळे व त्याच्या टोळीतील ११ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. शुभम उमाळे व त्याचे टोळके १७ सप्टेबर २०२४ रोजी रात्री साडेअकरा वाजता फिर्यादी यांच्या घरात शिरुन त्यांना मारहाण केली. कोयते व लाकडी दांडक्याने घरातील सामानाची तोडफोड करत आम्ही इथले भाई आहोत़ आमच्या नादी लागले तर कोणाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन हे टोळके निघून गेले होते. या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपींना अटक केली होती. पण, हे तिघे पळून गेले होते. या टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार जहांगीर पठाण व विशाल गाडे यांना बातमी मिळाली की, फरार आरोपी आय टी पार्क समोरील गिल्ट हॉटेलमध्ये आले आहेत. या बातमीची खात्री करुन पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी खडकी सहायक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, पोलीस अंमलदार जहांगीर पठाण, विशाल गाडे, विठ्ठल वावळ, प्रवीण भालचिम, विनोद महाजन, सुभाष आव्हाड यांनी केली