- February 3, 2025
- No Comment
मोबाईल विक्रीसाठी आलेला चोरटा गजाआड

पिंपरी: चोरी केलेले मोबाईल विक्रीसाठी आलेल्या एका सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली. निगडी येथील पवळे ब्रिजजवळ गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.30) करण्यात आली. जगदीश रामप्रसाद महतो (31, रा. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील बस स्थानक, बाजारपेठ यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने पोलिसांना विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार संदेश देशमुख आणि तेजस भालचिम यांना माहिती मिळाली की, चोरीचे मोबाईल विक्रीसाठी एक व्यक्ती निगडी येथील पवळे उड्डाण पुलाजवळ येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचला. जगदीश याला पोलिसांच्या हालचालींची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. झडती घेतल्यावर त्याच्या बॅगमध्ये आयफोन, विवो, ओपो, रियलमी, रेडमी यांसारख्या विविध कंपन्यांचे एकूण 16 मोबाईल फोन सापडले, ज्यांची किंमत 3 लाख 20 हजार रुपये एवढी आहे.
पोलिसी तपासात त्याने निगडी, पिंपरी, चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यातून निगडी, दौंड, सासवड, स्वारगेट पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
जगदीश हा मूळचा झारखंडचा असून पुणे रेल्वे स्थानक परिसरात वास्तव्यास होता. तो दिवसभर गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करून त्यांची विक्री करण्याचा नवा फंडा वापरत होता.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, दीपक खरात, देवा राऊत, संदेश देशमुख आणि तेजस भालचिम यांच्या पथकाने केली.