- February 3, 2025
- No Comment
लोणी काळभोरमधील घटनेचा 10 वर्षांनी निकाल, वडिलांचा खुन करणार्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

लोणी काळभोर: आपल्या सुनेवर वाईट नजर ठेवणार्या वडिलांचा ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करुन त्यांचा खुन करणार्या मुलाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सचिन अंबादास खोत (वय २७, रा. उरुळी कांचन) असे शिक्षा झालेल्या मुलाचे नाव आहे. अंबादास दिगंबर खोत (वय ५२, रा. उरुळी कांचन) असे खुन झालेल्या वडिलांचे नाव आहे. ही घटना २९ ऑक्टोबर २०१४ रोजी घडली होती.
आरोपीचे वडिल अंबादास खोत यांची आरोपीच्या पत्नीवर वाईट नजर होती. ते नेहमी आरोपीच्या पत्नी समोर फिरायचे व तिचा हात धरुन तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करायचे. २९ ऑक्टोबर २०१४ रोजी अंबादास खोत हे जेवण करत असताना आरोपी सचिन त्याचे वडिलांना आपण रात्री शेतात पाणी द्यायला जाऊ असे म्हणला. त्यावर त्याचे वडिल अंबादास खोत हे सचिन याला तू शेतात पाणी द्यायला जा मी घरात झोपतो, असे म्हणाले. त्यांच्या बोलण्याच्या राग आल्याने त्याने ऊस तोडण्याच्या कोयत्याने वडिल अंबादास खोत याच्यावर वार करुन खुन केला.
या गुन्ह्याचा सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंग यांनी सखोल तपास करुन सबळ पुराव्याअंती आरोपीविरुद्ध सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी पी जाधव यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे सादर केलेले पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व २५ हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ललिता कानवडे यांनी या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून कामकाज पाहिले.