- February 3, 2025
- No Comment
कामशेतमध्ये पेट्रोल-रॉकेलचा अवैध साठा जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कामशेत: लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या आणखीन एका कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कामशेत येथे गुरुवारी (दि.३०) पोलिसांनी धडक कारवाई करीत ७४० लीटर पेट्रोल आणि १०५ लीटर रॉकेलचा अवैध साठा जप्त केला आहे.
कामशेत येथील गदिया कॉम्प्लेक्समध्ये एका खोलीत ज्वलनशील पदार्थांचा अवैध साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यांनी या माहितीच्या आधारे छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश कामशेत पोलिसांना दिले. त्यानुसार कामशेत पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा सुभाष रतनचंद गदिया (रा. कामशेत) याने गदिया कॉम्प्लेक्समधील एका खोलीत पेट्रोल सदृश्य आणि रॉकेल सदृश्य ज्वलनशील द्रव्य पदार्थांचा अवैध साठा करून ठेवल्याचे आढळून आले.
पोलिसांनी आठ बॅरलमधून ७४० लीटर पेट्रोल आणि १०५ लीटर रॉकेलचा साठा जप्त केला असून एकूण ८० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपी सुभाष रतनचंद गदिया याच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम २८७ सह अत्यावश्यक वस्तू अधिनयम सन १९५५ चे कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शेडगे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नितेंद्र कदम यांच्या पथकाने केली.