- February 4, 2025
- No Comment
कीरकोळ वादात दोघांना बेदम मारहाण ! डोक्यात वीट घातली, चाकूने छातीवर केला वार, कोंढव्यातील घटना

पुणे: मित्राबरोबर फिरत असताना याच्याबरोबर का फिरतो, असे म्हणून मित्राला चापट मारली. त्याचा जाब विचारल्यावर टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात वीट मारली तर मित्राच्या छातीत चाकूने वार केला.
याबाबत अक्षय अंबऋषी शेलार (वय २४, रा. टिळेकरनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जयेश बांगर, साधु बांगर, ऋतिक बांगर, ज्ञानेश बांगर (सर्व रा. कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एनआयबीएम रोडवरील सिद्धार्थनगर येथे ३१ जानेवारी रोजी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शेलार हा इलेक्ट्रीशन म्हणून काम करतो. घरी जेवण केल्यानंतर तो मोटारसायकलवरुन त्याचा मित्र मंतर कांबळे याच्यासह फिरत होते. त्यावेळी वाटेत मंतर याचा ओळखीचा जयेश बांगर त्यांना भेटल. तो मंतर याला म्हणाला,तू या पोराबरोबर का फिरतो असे म्हणून जयेशने मंतरच्या कानाखाली मारली. त्यावर मंतर यांचे घरी जाऊन आईला घेऊन आला. तिघे जण जयेश बांगर याच्या घरी गेले. मंतरच्या आईने जयेशला जाब विचारला असता जयेशने रागाच्या भरात फिर्यादी याला हाताने मारण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी जयेशला धक्का दिला असता तो खाली पडला. तेव्हा जयेशचे भाऊ साधु, ऋतिक, ज्ञानेश बांगर यांनी शेलार याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ज्ञानेश याने शेलार याच्या डोक्यात वीट मारल्याने डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यावर त्याचा मित्र निलेश् घाडगे हा फिर्यादीला वाचविण्यासाठी मध्ये आला. तेव्हा जयेश बांगरने त्याच्या खिशातून चाकू काढला व निलेशच्या छातीवर मारला. निलेश जोरात ओरडला. त्याच्या छातीतून रक्त येऊ लागले, हे पाहून सर्व जण तेथून पळून गेले. पोलिसांनी दोघांना ससून रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक संदिप राऊत तपास करीत आहेत.