- February 4, 2025
- No Comment
बनावट जामीनदार रॅकेटप्रकरणी दोन वकिलांसह ११ जण जेरबंद

पुणे : कारागृहात असलेल्या गुन्हेगारांसाठी न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
जामीनासाठी कागदपत्रे तयार करण्यापासून ते न्यायालयात सर्व चित्र खरे असल्याचे भासवून न्यायालयाची दिशाभूल करीत अनेकांना आजवर जामीन मिळवून देण्यात आले. पोलिसांनी हे रॅकेट उद्धवस्त करत २ वकिलांसह ११ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या रॅकेटमध्ये वकिलांसोबतच न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती परिमंडळ पाचचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.
अॅ्ड. असलम गफुर सय्यद (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) आणि अॉड. योगेश सुरेश जाधव (वय ४३, रा. हडपसर) अशी अटक वकिलांची नावे आहेत. बनावट व चोरुन रबरी शिक्के तयार करुन देणारा दर्शन अशोक शहा (वय ४५, रा. सोलापूर बाजार, कॅम्प) या दुकानदारासह एकेरी पानाचे रेशन कार्ड प्राप्त करुन देणारे पिराजी ऊर्फ चंद्रकांत मारुती शिंदे (वय ६०, रा. भारतमाता चौक, मोशी, ता. हवेली) आणि गोपाळ पुंडलीक कांगणे (वय ३५, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनाही गजाआड करण्यात आले आहे. शहाकडून ९ रबरी शिक्के व मशीन जप्त करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी फरहान ऊर्फ बबलु शेख (रा. वैदवाडी, हडपसर) आणि अॅतड. नरेंद्र जाधव आहेटत. सय्यद व योगेश जाधव यांनी शेख व नरेंद जाधव यांच्याशी संगनमत केले. काही जणांना या रॅकेटमध्ये सहभागी करून घेतले. त्याआधारे बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यास सुरुवात केले. जामीनाचा मोबदला म्हणून रोख स्वरुपात लाखो रुपये उकळण्यात आल्याचा कबुली जबाब न्यायालयीन कोठडीत असलेल्या संतोषकुमार शंकर तेलंग याने न्यायालयात १५ जानेवारी रोजी दिला. त्यावरुन पोलिसांनी ही कारवाई केली.
९५ रेशनकार्ड, ११ आधार कार्डसह विविध कागदपत्रे असा ८९ हजार २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे म्हणाले, की गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या गुन्हेगारांसाठी जामीनदार होण्यासाठी लोक घाबरतात. त्यांना आवश्यक असलेला लायक जामीन मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी या वकीलांनी बनावट जामीनदार पुरवण्याचे रॅकेट तयार केले. वानवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धनाजी टाणे पुढील तपास करत आहेत.