- February 4, 2025
- No Comment
आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत एर्टिगा चालकास लिफ्ट मागून त्याची हत्या केल्या, प्रकरणी गुन्हा उघड

पुणे: प्रवासी म्हणून एर्टिगा कारमध्ये बसून कारचालकाला मारहाण करुन त्याचा खुन करुन वाटेत मृतदेह टाकून कार चोरुन नेणार्याच्या टोळीचा ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे.
नाशिकमधील तिघांना अटक केली आहे.
विशाल आनंद चव्हाण (वय २२, रा. महेश अपार्टमेंट, गंगापूर रोड, नाशिक), मयुर विजय सोळसे (वय २३, रा. गोकुळवाडी, श्रीरंगनगर, नाशिक) आणि ऋतुराज विजय सोनवणे (वय २१, रा. गोकुळवाडी, गंगापूर रोड, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राजेश बाबुराव गायकवाड (वय ५६, रा. निधी अपार्टमेंट, जेल रोड, नाशिक)असे खुन झालेल्या कारचालकाचे नाव आहे. राजेश गायकवाड यांचा आळेफाटा येथील संतवाडी परिसरात दोन्ही हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यावरुन आळेफाटा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
युवराज शिंदे याने यापूर्वी इतर साथीदारांचे मदतीने अशा प्रकारचे गुन्हे पद्धतीचा अवलंब करुन इरटीगा कार जबरदस्तीने चोरुन नेली होती. त्याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हा दाखल आहे. आरोपी हे सराईत असून विशाल चव्हाण व मयुर सोळसे यांच्यावर गंगापूर (नाशिक) पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. युवराज शिंदे याच्यावर मालमत्ता चोरी व शरीराविरुद्धचे चार गुन्हे दाखल आहेत.
राजेश गायकवाड ह २७ जानेवारी रोजी नाशिक येथून इरटीगा कारने भाडे घेऊन पुण्यात आले होते. रात्री साडेदहा वाजता गायकवाड यांनी आपल्या पत्नीला फोन करुन पुण्याहून निघाल्याचे सांगितले. पण ते नाशिकला पोहचलेच नाही. त्यांचा मोबाईल पुणे -नाशिक महामार्गावरील संतवाडी रोडवरील समाधान हॉटेलमध्ये आहे, या माहितीच्या आधारे त्यांचे कुटुंबीय आळेफाटा येथे आले. त्यांनी शोध घेतल्यानंतरही न मिळाल्याने अगोदर हरविल्याची तक्रार नोंदविली. दरम्यान दुसर्या दिवशी संतवाडी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मृतदेह मिळून आलेल्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात नाशिक ते पुणे महामार्गाचे लेनलगतच्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश गायकवाड यांच्याकडील इरटीगा कार ही विरुद्ध दिशेने येऊन मृतदेह मिळालेल्या ठिकाणी गेली व पुन्हा मागे आळेफाटा बाजूकडे जाऊन माळशेज घाटाकडे गेली होती. येताना राजेश गायकवाड यांची इरटीगा कार चाळकवाडी टोलनाक्यावरुन नाशिककडे जाताना कारमध्ये त्यांचे व्यतिरिक्त आणखी दोन जण होते. एका व्यक्तीचे डोक्यात पांढर्या रंगाची टोपी होती. त्याद्वारे चाकण चौकातील नाशिककडे जाणार्या गाडीतळावर जाऊन चौकशी केली असता टोपी घातलेल्या व्यक्तीसोबत इतर तीन व्यक्ती असल्याचे आढळून आले. कार कसारा घाटात मिळून आल्याने आरोपी नाशिक परिसरातील असावेत, असा संशय बळावल्याने पथकाने त्या परिसरातील गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळविली. तेव्हा फुटेजमधील व्यक्ती हा नाशिकमधील युवराज शिंदे, विशाल चव्हाण हे असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे चौकशी केल्यावर ते ओतूरकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नाशिकला जाण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये बसले आणि आळेफाट्याजवळ राजेश गायकवाड यांचा कारमध्येच गळा आवळून खुन केला. मृतदेह तेथेच टाकून कार घेऊन गेल्याचे सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, आळेफाटाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे, पोलीस अंमलदार दीपक साबळे, राजु मोमीन, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, विनोद गायकवाड, अमित माळुंजे, सचिन कोबल, गणेश जगताप, ओकार खुणे यांनी केली आहे.