- February 6, 2025
- No Comment
बांधकाम व्यावसायिकाला घातला १४ लाखांना गंडा; आरोपी महिले विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात अकाऊंटस ऑफिसर म्हणून काम करत असताना एसआरए स्कीमसाठी पैसे दिल्याचे दाखवून प्रत्यक्षात धनादेशावर खोट्या सह्या करुन स्वत:च्या खात्यात पैसे घेऊन एका महिला अधिकार्याने तब्बल १४ लाख ३१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सौजन्य सूर्यकांत निकम (वय ३३, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अनुश्री आनंद सावंत (वय ४३, रा. सहकारनगर) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सदाशिव पेठेतील केदार असोसिएटस येथे फेब्रुवारी २०१९ ते २० एप्रिल २०२४ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुश्री सावंत या केदार असोशिएट येथे अकाऊंटस ऑफिसर म्हणून काम करत होत्या. त्यांच्याकडे सर्व अकाऊंट रेकॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी होती. केदार असोसिएटस हे प्रामुख्याने एसआरएच्या स्कीम करत असतात. या काळात त्यांनी धनादेशाद्वारे एसआरए स्कीमसाठी पैसे दिल्याचे दाखविले. प्रत्यक्षात अॅथोराईज सिग्नेटरी म्हणून खोट्या सह्या करुन पदाचा गैरवापर करुन त्यांनी हे पैसे स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करुन १४ लाख ३१ हजार २७२ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. रेकॉर्डवर हे पैसे एसआरए स्कीमसाठी दिल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात एसआरए स्कीमसाठी पैसे मिळाले नसल्याचे लक्षात आल्यावर हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. सहायक पोलीस निरीक्षक उसगांवकर तपास करीत आहेत.




