- February 7, 2025
- No Comment
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने गुन्हेगारांना ‘अपवित्र’ केले जाईल असे भूमिका पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केली
पुणे : शहरात वाढत चाललेले वाहनांचे तोडफोडीचे प्रकार तसेच अन्य गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने गुन्हेगारांना ‘अपवित्र’ केले जाईल असे भूमिका पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केली. ‘गंगाजल’ चित्रपटात गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी ‘सब पवित्र कर देंगे’ असा संवाद आहे. त्याचप्रमाणे शहरातील गुन्हेगारांची धिंड काढून, कायदेशीर मार्गाने त्यांना अपवित्र केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस उपायुक्त परिमंडळ चारच्या कार्यक्षेत्रातील किमती मुद्देमाल वितरण समारंभात अमितेश कुमार बोलत होते. विविध १०१ गुन्ह्यातील गुन्ह्यांमध्ये चोरीला ४ कोटी ८६ लाख ५६ हजार २०६ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीूस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, विठ्ठल दबडे यांच्यासह पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती
चतु:श्रृंगी पोलिसांनी दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल परत केल्याप्रकरणी आणि लोणीकंद पोलिसांनी दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत केल्याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांचे अमितेश कुमार यांनी कौतुक केले. तर, येरवडा, विमाननगर आणि चंदननगर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत, आणखी जोरात काम करुन मुद्देमाल फिर्यादींना परत करावा, अशा सूचना दिल्या. चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यानंतर नागरिक अपेक्षेने पोलिसांकडे बघतात. अशा घटनांनंतर फिर्यादींना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे सांगत येत्या काळात शहरात आणखी शिस्तबद्ध वातावरण बघायला मिळेल असे अमितेश कुमार यांनी सांगितले