- February 18, 2025
- No Comment
विवाहाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल 34 लाखांना घातला गंडा
पुणे: राज्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विवाहाच्या आमिषाने आयटी इंजिनिअर तरुणीची ३४ लाखांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला बाणेर पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
त्याने तरुणीला तब्बल ३४ लाख रुपयांना गंडा घातला. साईश विनोद जाधव (वय २५, रा. साईबाबानगर, चेंबूर, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणीने बाणेर पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी बाणेरमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहते. बालेवाडीतील हायस्ट्रीट येथील आयटी कंपनीत नोकरी करते. तिने २०२३ मध्ये मॅट्रोमेनियल साईटवर नाव नोंदणी केली होती. तेव्हा साईश जाधवची साईटवरून ओळख झाली होती. साईशने तिला विवाह करण्याबाबत बोलणी केली. नंतर मे २०२३ मध्ये तो भेटण्यासाटी बाणेर येथे आला. दोघांनी सोबत जेवणही केले. नंतर तो पुन्हा तरुणीला भेटण्यास आला. तरुणीने कुटुंबीयांबाबत विचारपूस केली. तेव्हा त्याने आई-वडिलांचे निधन झालेले असून, भाऊ दुबईत नोकरीला आहे, अशी माहिती दिली. बोलण्यावर विश्वास ठेवला. पुढे दोघांतील संवाद वाढला. साईशने तरुणीला सांगितले की, माझ्या मित्राने माझी फसणूक केली, ते पैसे न भरल्यास मला कारागृहात जावे लागेल. हे बोलतानाच त्याने लग्नही लवकर करू, असे सांगितले.
मोबाइल बिघाडल्याचे सांगून तरुणीकडून महागडा मोबाइलही घेतला. तसेच वेगवेगळी कारणे सांगत पैसेही घेतले. तरुणीने वेळेवेळी त्याला १५ लाख रुपये दिले. नंतरही त्याने गेल्या दीड ते पावणेदोन वर्षात अशीच वेगवेगळी कारणे सांगत गेल्या तरुणीकडून एकूण ३३ लाख ८२ हजार रुपये घेतले. तरुणीने लग्नाबाबत विचारल्यानंतर मात्र तो टाळाटाळ करत असे. तरुणीला संशय आल्याने तरुणीने विचारपूस केली असता तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. नंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. बाणेर पोलिसांनी तपास करून साईशला पकडले. सहायक निरीक्षक अनिल केकाण अधिक तपास करत आहेत.