- March 15, 2025
- No Comment
पुणे: पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची वाढदिवसा दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्कच्या विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसा दिवशीच गळफास घेऊन पुण्यात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अशीत देवलाल सोनोने (वय-२०) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. अशीत मुळचा वाशिम जिल्हयातील किनखेड, ता- कारंजा येथील रहिवाशी असून तो शिक्षणासाठी अकोल्यात मित्रासोबत भाड्याने खोली करून राहात होता. पत्रकारिता व जनसंवाद पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला तो शिक्षण घेत होता.
अत्यंत शिस्तप्रिय व हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. बऱ्याच दिवसापासून तो महाविद्यालयात येत नव्हता. त्याचा मोठा भाऊ पुण्यात असून त्याच्याकडे जातो असे त्याने त्याच्या काही जवळच्या मित्रांना सांगितले होते. बुधवार (दि.१२ मार्च ) त्याचा वाढदिवस होता. या दिवशीच त्याने गळफास घेत जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. त्याच्यावर पुण्यातच गुरुवारी (दि.१३) अंत्यसंस्कार करण्यात आले.