- November 9, 2025
- No Comment
कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार आरोपी गुंड जयेश वाघला ठाणे जिल्ह्यातून अटक

पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार आरोपी नीलेश घायवळ टोळीतील सराईताला खंडणी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातून अटक केली. जयेश कृष्णा वाघ (३६, रा. विठ्ठल मंदिरासमोर, केळेवाडी, कोथरूड), असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.
कोथरूड गोळीबार प्रकरणात नीलेश घायवळ याच्यासह साथीदारांविरोधात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. घायवळ टोळीतील गुंड वाघ याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. पसार झालेल्या वाघ याचा शोध घेण्यात येत होता. वाघ हा ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात असलेल्या कोंडारी गावात वास्तव्यास असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलिस कर्मचारी राजेंद्र लांडगे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कोंडारी गावात लपलेल्या वाघ याला ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, पोलिस कर्मचारी अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, अमर पवार, नितीन बोराटे, अविनाश कोंडे, बबलू मांढरे, नागनाथ राख यांनी ही कारवाई केली.




