- November 30, 2025
- No Comment
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १५ लाख रुपये किंमतीच्या ३७ दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ एक मधील वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. १५ लाख रुपये किंमतीच्या ३७ दुचाकी आणि दोन ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या.
मुबीन नुरमुहम्मद शेख (वय २५, रा. पिंपळेगुरव), फैज फिरोज शेख (वय २२, रा. धुळे), अमन प्रेमचंद्र शुक्ला (वय १९, रा. संत तुकारामनगर, पिंपरी), सुनील शांताराम मोरे (वय ३०, रा. उरळी कांचन) आणि राजू शंकर मराठे (वय ४६, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यात दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग उघड झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो स्थानक आणि गर्दीच्या भागात वाढणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार यांनी विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पथकाने चोरीच्या घटनांमधील १०० ते १५० ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. तांत्रिक तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा मागोवा घेत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केल्याचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी सांगितले.