- November 30, 2025
- No Comment
व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू, शिवम आंदेकरची धुळे कारागृहात रवानगी
पुणे : गणेशपेठ येथील मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली खंडणी उकळल्याप्रकरणी कुख्यात आंदेकर टोळीप्रमुख बंडू आंदेकर आणि त्याचा पुतण्या शिवम आंदेकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुण्याच्या मकोका न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांना धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.
या प्रकरणी बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर आणि इतर असे एकूण अकरा जणांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. व्यापाऱ्यांकडून २० कोटी रुपयांहून अधिक खंडणी उकळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपींच्या खात्यात तब्बल २१ कोटी ६० लाख रुपये जमा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस कोठडीनंतर शुक्रवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. ए. एस. धीवार आणि ॲड. गणेश माने यांनी बाजू मांडली.