- November 30, 2025
- No Comment
सराईत आरोपीकडून पिस्तूल जप्त:पुणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनची दांडेकर पूल परिसरात कारवाई

पुणे : खुन, खुनाचा प्रयत्न तसेच तडीपार, स्थानबद्ध अशा वेळोवेळी कारवाया झालेल्या सराईत गुन्हेगाराकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहे.
नरेंद्र महादेव बलकवडे (वय ३५, रा. चाळ नंबर ७, मेहंदळे गॅरेज, एरंडवणे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
नरेंद्र बलकवडे याच्यावर गेल्या १० वर्षापासून वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागातील गुंडांना तडीपार केले होते. त्यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील दोघांसह १८ सराईत गुन्हेगाराना तडीपार केले होते. त्यामध्ये नरेंद्र बलकवडे याचा समावेश होता.
नरेंद्र बलकवडे याच्याविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात विनयभंग, खुनाचा प्रयत्न असे ६ गंभीर गुन्हे दाखल होते. तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी त्याला नोव्हेंबर २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एक वषार्साठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले होते. तसेच कोथरुड पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार नितीन जगदाळे, तुषार किंद्रे हे २८ नोव्हेंबर रोजी रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत दांडेकर पुल परिसरात आले. त्यावेळी पोलीस अंमलदार अमित बोडरे व नितीन जगदाळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पर्वती कॅनाल रोड येथे एक जण पिस्टल घेऊन थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे नरेंद्र बलकवडे हा सराईत गुन्हेगार थांबला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे १ पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याला पुढील कारवाईसाठी पर्वती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार अमित बोडरे, नितीन जगदाळे व तुषार किंद्रे यांनी केली आहे.




