- December 8, 2025
- No Comment
पुण्यातील सामाजिक चळवळीचा मोलाचा स्तंभ हरपला, डॉ. बाबा आढाव यांचे निधन
पुणे, ८ डिसेंबर २०२५: महाराष्ट्रातील श्रमिक व वंचित समाजासाठी आयुष्य समर्पित केलेल्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (बाबा आढाव) यांचे आज पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये निधन झाले. काही दिवसांपासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ICU मध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. आढाव हे खास करून हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर यांच्यासाठी न्याय आणि सन्मान मिळवून देणारे निःस्वार्थ नेता होते. त्यांनी ‘हमाल पंचायती’ स्थापन करून महाराष्ट्रभर हजारो कामगारांना संघटित केले आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण केले. तसेच, ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीच्या माध्यमातून जातीय भेदभाव कमी करण्याचा प्रयत्न केला.
त्यांना पुण्यभूषण पुरस्कार (२००६), द वीक मॅन ऑफ द इयर (२००७), आणि टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट जीवनगौरव पुरस्कार (२०११) यांसारख्या प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले.
डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने समाजातील कष्टकरी व वंचित घटकांसाठी लढणारा एक महत्त्वाचा स्तंभ हरवला आहे.