पुणे: गरजेपोटी 20 हजार रुपये दहा टक्के दराने व्याजाने घेतल्यानंतर वेळोवेळी त्या बदल्यात 32 हजार 500 रुपये गुगल पेद्वारे परत दिले. मात्र, त्यानंतर 40 हजार रुपये घेतले नसतानादेखील पती-पत्नीला डांबून 20 हजार रुपये जबरदस्तीने फोन पेद्वारे घेऊन धमकावणार्या दोघा आरोपीना चंदननगर पोलिसांनी अटक केली.
शुभम धनंजय जाधव (वय 26, रा. आंबेडकर वसाहत, बारामती), आशिष ऊर्फ अशोक मुरलीधर गायकवाड (वय 31, रा. बायबास रोड, मुंढवा ब्रीजजवळ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मामा-भाचे आहेत. याबाबत बालाजीनगर धनकवडी येथील 28 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जानेवारी 2021 पासून सुरू होता. फिर्यादी व्यक्तीने पैशाची गरज असल्यामुळे शुभम याच्याकडून 20 हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात वेळोवेळी फिर्यादीने आरोपीला गुगल पे व फोन पेद्वारे 32 हजार 500 रुपये परत केले होते.
मात्र त्यानंतरदेखील शुभम आणि त्याचा मामा आशिष हे दोघे फिर्यादीने घेतले नसतानादेखील 40 हजार रुपयांची मागणी करत होते. त्यातूनच दोघांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला साईनाथनगर खराडी येथील ऑफिसमध्ये डांबून ठेऊन बळजबरीने फोन पेद्वारे 20 हजार रुपये घेतले. त्यानंतर कोरे धनादेश घेऊन व्याजाची रक्कम साठ हजार रुपये ठरवून ती न दिल्यास घरी येण्याची धमकी दिली. ‘हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने चंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली,’ अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली.