- October 8, 2022
- No Comment
पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक राजेश पिल्लेंवर पंधरा कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले उर्फ राजेश पिल्ले यांच्यावर पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.7) 15 कोटींची फसवणूक केल्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संजय दयानंद ओसरमल (वय 39, रा.पिंपरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पिल्ले यांनी ब्रह्माकॉर्प लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक रामकुमार अग्रवाल यांच्यातर्फे जमीन खरेदी विक्री व्यवहारांमध्ये प्रिसिपल एजंट (विश्वस्त प्रतिनिधी) म्हणून काम करत असून पिल्ले यांनी पुण्यातील चरवली बुद्रुक येथील सर्वे नंबर 210 हिस्सा नंबर 6 मधील एकूण 95 आर ही मिळकत कंपनीचे संचालक रामकुमार ब्रह्मदत्त अगरवाल यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर संतोष सोपानराव लांडगे व धनंजय हनमंत लांडगे (रा. पिंपरी) यांना खरेदीखत करत 15 कोटींना विकली.
त्यामुळे ब्रह्माकॉर्प कंपनीचा विश्वासघात करून 15 कोटी रुपयाचा अपहार करत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीची फसवणूक केली म्हणून पिल्ले यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अद्याप पिल्ले यांना अटक झाली नसून चंदननगर पोलीस पुढील तपास करत आहेत.