- October 9, 2022
- No Comment
डॉक्टरला खंडणी मागणाऱ्या तीन टाळक़यांवर गुन्हा दाखल
भोसरी: महिला दर महिन्याला सात हजार रुपये द्यावे लागतील. तरच तू दवाखाना चालवू शकतो, अशी धमकी देत तिघांनी एका डॉक्टरकडे खंडणी मागितली. तसेच मेडिकलमधून पैसे न देता औषधे नेली. ही घटना आनंदनगर चौक, भोसरी येथे घडली.
पुरुषोत्तम कारभारी राणे (वय 42, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुदर्शन उर्फ पिल्या संभाजी राक्षे (वय 25), गोविंदा कोळी (वय 24), सचिन सारसे उर्फ काळा सच्या (वय 23, सर्व रा. आनंदनगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आनंदनगर चौकात पुरुषोत्तम क्लिनिक आहे. ते बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजता क्लिनिक मध्ये असताना आरोपी क्लिनिकमध्ये आले. तू मला दर महिन्याला सात हजार रुपये हप्ता म्हणून द्यावे लागतील. तरच तू दवाखाना चालवू शकतो. नाहीतर तुला दवाखाना चालवू देणार नाही. इलाक्यात फिरू देणार नाही. दर महिन्याला गोविंदा कोळी आणि काळा सच्या येऊन तुझ्याकडून सात हजार रुपये घेऊन जातील, अशी आरोपींनी फिर्यादींना धमकी दिली. क्लिनिकच्या बाहेर असलेल्या मेडिकल मधून आरोपींनी औषधे घेतली, त्याचे पैसे न देता मेडिकल मालकाला शिवीगाळ करून आरोपी निघून गेले.
भोसरी पोलीस तपास करीत आहेत.