- October 10, 2022
- No Comment
कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीकडून व्यवसायिकाचे अपहरण, गुंड गजा मारणेसह दहा जणांवर गुन्हा दाखल
पुणे: कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीतील टोळक्यांनी व्यावसायिक व त्याच्या मित्राचे अपहरण करून त्यांच्याकडे तब्बल 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पैसे न दिल्यास व्यावसायिक व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास कररून व्यवसायिक व त्याच्या मित्राची सुखरूप सुटका केली. तसेच मारणे टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी कुख्यात गुंड गज्या उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (रा.शास्त्रीनगर,कोथरुड), सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप (रा. गोविंदराव पाटील नगर, धनकवडी), अमर शिवाजी किर्दत (रा. एम.आय.डी.सी. कोडोवली, सातारा), हेमंत बालाजी पाटील (रा. बुरली,पलुस सांगली), फिरोज महंमद शेख (रा. समर्थनगर कोडोवली, सातारा), एक अनोळखी महिला आणि त्यांचे इतर तीन ते चार साथीदार यांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिंहगड रस्ता परिसरात राण्यास असून त्यांचा जमीन खरेदी विक्री व शेअर ट्रेडींगचा व्यवसाय आहे. शुक्रवारी (ता.7) तक्रारदार व त्यांचे मित्र कात्रज येथील आयसीआयसीआय येथे थांबले होते. त्यावेळी काही अनोळखी व्यक्तींनी त्यांचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवुन मुंबई बंगळूर महामार्गावर नेले. तेथे त्यांना रात्रभर वेगवेगळया गाडीमधुन फिरवून, खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच तक्रारदार यांची गाडी जबरदस्तीने काढून घेत २० कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली, पैसे न दिल्यास तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांना मिळाली. तसेच या गुन्ह्यात कुख्यात गुंड गजा मारणे व त्याच्या टोळीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची गोपनीय माहिती ही प्राप्त झाली आहे.