- October 13, 2022
- No Comment
गैरअर्जदार माथाडी कामगार खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल
पुणे: रेल्वे मालधक्क्यावरचा माल उचलण्यावरून हमाल पंचायतच्या सदस्याने खंडणी मागत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. यावरून पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक दोन यांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
पप्पु भिवा खरात (रा. औंध) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून आरोपीने आत्तापर्यंत खंडणी स्वरुपात 2 लाख 90 हजार घेतले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आरोपी हा गैरअर्जदार माथाडी कामगार असून तो नोंदणीकृत 14 माथाडी कामगारांना रेल्वे माल धक्क्यावरील माल उचलण्यास मनाई करत होता. यावेळी त्याने माथाडीचे काम आम्ही करणार, नाही तर काम बंद करा, जर काम केले तर तुमच्यावर खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली.
तसेच काम बंद पाडून नोंदणीकृत कामगारांना काम करु न देता त्यांच्याकडून वेळोवेळी खंडणी स्वरुपात 2 लाख 90 हजार रुपये स्विकारले. तसेच, यापुढे प्रती रॅकला 50 हजार रुपयांची मागणी केली. त्याच्या या त्रासाला कंटाळून कामगारांनी पोलीसात धाव घेतली.
प्राप्त झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पप्पु याच्यावर खंडणी मागण्याचा व धमकावण्याचा गुन्हा खडकी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. पप्पु खरात हा हमाल पंचायतचा सदस्य असून भरणा वेळेत नसल्याने 2015 साली त्याचे माथाडी बोर्डाने रजिस्ट्रेशन रद्द केल्याचेही समोर आले आहे.