- October 21, 2022
- No Comment
लग्नाच्या खोट्या आमिषाने प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न
भोसरी: प्रियकराने लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा ठरवला. यामुळे प्रेयसीने विषप्राशन केले. ही घटना आळंदी रोड भोसरी येथे घडली.
शाम माऊली बिडगर, माऊली बिडगर (दोघे रा. दावतपुर, परळी बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विषप्राशन केलेल्या तरुणीच्या बहिणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाम याने फिर्यादी यांच्या बहिणीसोबत इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ओळख केली. तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शाम याने तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर शाम याने फिर्यादी यांच्या बहिणीसोबत लग्न न करता दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा ठरवला. शामने फिर्यादीच्या आई वडिलांना शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला. यातून फिर्यादी यांच्या बहिणीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. सध्या तिच्यावर पिंपरी मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तरुणी बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.