- November 2, 2022
- No Comment
जमिनीच्या वादातून नातेवाईकावर हल्ला करणारी चार टाळकी जेरबंद, हिंजवडी पोलिसांची कामगिरी
हिंजवडी: जमिनीच्या वादातून नातेवाईकावर गावठी पिस्तुलाने फायर करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार आरोपींना आठ तासात अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाने पुढील तपास करून त्यांनी यापूर्वी केलेले 16 गुन्हे उघडकीस आणून चोरीचा 8.17 लाख रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे.
अशी माहिती आनंद भोईटे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड) यांनी आज हिंजवडी पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
याबाबत इशू मारवाडी (वय 28 वर्षे, रा. ब्लू डार्ट कंपनीजवळ, शिव कॉलनी, नेरे दत्तवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानुसार अवघ्या 8 तासात पोलिसांनी विक्की उर्फ विकास रजपूत (वय 24 वर्ष, रा. वेणुनगर गणेश मंदिरासमोर, वाकड, पुणे), पृथ्वीराज राठोड (वय 20 वर्षे, रा. मु. पो. भोसे, ता. खेड, जि. पुणे), ज्ञानेश्वर उर्फ काळ्या उर्फ शित्रुन राजपुत (रा. बुद्ध विहार मंदिरासमोर, वाडे बोलाई, ता. हवेली, जि. पुणे), राजु ठाकूर (वय 20 वर्षे, रा. आकुर्डी स्टेशन जवळ, सप्तशृंगी कॉलनी, नंद डेअरी जवळ पुणे) या आरोपींना अटक केली. त्यांच्या विरोधात भा.द.वि कलम 307, 504, 506, 34 सह आर्म ऍक्ट 3/ 25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3) 135 अन्वये हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी येशू लुटेरा यांचा पुतण्या विक्की राजपूत याच्या बरोबर वाकड येथील जागेसंदर्भात वाद चालू होते. त्या वादातून विकी राजपूत व त्याच्या साथीदारांनी 20 ऑक्टोबर रोजी फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादी, त्यांचे चुलते नागु मारवाडी, चुलत भाऊ नितीन मारवाडी व वडील लुटेरा मारवाडी यांना शिवीगाळ केली. तसेच, आरोपी विक्की राजपूत याने फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील गावठी पिस्तूलने गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या फिर्यादीच्या हाताला घासून गेल्या व त्यामध्ये फिर्यादी जखमी झाले. ते स्वतःला वाचवण्यासाठी पळून गेले आणि एका ठिकाणी लपल्याने आरोपी विक्की राजपूत याच्या सोबत असलेल्या राजु ठाकूर, पृथ्वीराज राठोड, शित्रुन राजपुत आणि किरण यांनी इतरांवर दगडे मारली.
तसेच, विक्की राजपूत याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये गोळी झाडली. हा गुन्हा घडल्याची माहिती मिळताच, अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनासनुसार या गुन्ह्याचा तात्काळ तपास चालू करून तपास पथकातील अंमलदार यांची दोन पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. तपासा दरम्यान घटनास्थळावर मिळालेल्या दोन रिकाम्या पुंगळ्या व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले होते.
तसेच, नेमलेल्या शोध पथकाने आरोपींचा माग काढण्यासाठी घटनास्थळाच्या आजूबाजूचे तसेच आरोपी मिळून येणाऱ्या संभाव्य ठिकाणाचे एकूण 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना हिंजवडीतून चार आरोपी हे दोन दुचाकी गाडीवरून पळून जात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा घडल्यापासून आठ तासाच्या आतच अटक केली.
तपासादरम्यान अटक आरोपी विक्की राजपूत याच्याकडून फायर केलेली गावठी पिस्तूल व जिवंत चार काडततुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच पुण्यात वापरलेल्या मोटरसायकल देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
त्यांच्याकडे कसून केलेल्या तपास दरम्यान समजले, की 25 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 7.30 वाजता व्यापारी सुनील श्रीकांत कदम (रा. मलवडी, ता. माण, जि. सातारा) हे दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने घेऊन दुचाकीवरून जात असताना त्यांना अटक आरोपी पृथ्वीराज राठोड ज्ञानेश्वर उर्फ काळया उर्फ शित्रुन राजपुत, राजु ठाकुर व त्यांच्या इतर दोन साथीदारांनी अडवून गावठी पिस्टलने फायर करून व तलवारीने मारहाण करून त्यांच्याकडील 40 तोळे सोन्याचे दागिने व 30 किलो चांदीची दागिने घेऊन पळून गेले हॊते.
याबाबत त्यांच्याविरुद्ध दहिवडी, पोलीस स्टेशन, सातारा येथे भा.द.वि कलम 395, 397, 307, आर्म ऍक्ट कलम 3(25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा केल्यापासून हे आरोपी फरार होते व ते पोलिसांना सापडत नव्हते. हिंजवडी पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांच्याकडून दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोने व्यापाऱ्यावर टाकलेल्या दरोडाच्या गुन्ह्यातील 9 तोळे 2 ग्रामचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच वरील आरोपींनी हिंजवडी, निगडी, पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे असे एकूण 16 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील चोरीस गेलेला एकूण 8.17 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली.
सदरची कारवाई अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पिंपरी चिंचवड, श्रीकांत डिसले, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, वाकड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहिफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापु देशमुख, तपास पथकाचे प्रमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास इंगळे, विक्रम कुदळ, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओम प्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडित यांनी केली आहे.