- November 4, 2022
- No Comment
गांजा व गुटखा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
हिंजवडी: पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी आणि पिंपरी येथे दोन कारवाया केल्या. हिंजवडी येथून गांजा तर पिंपरी मधून गुटखा जप्त करण्यात आला आहे.
हिंजवडी फेज तीन येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून दोघांना अटक केली.
अशोक राजेंद्र तेलंग (वय 35, रा. हिंजवडी. मूळ रा. कर्नाटक),आशादुल्ला अली अब्दुल कासीम (वय 26, रा. हिंजवडी. मूळ रा. आसाम) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी फेज तीन येथे दोघेजण गांजा विक्रीसाठी आले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अशोक आणि आशादुल्ला या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 654 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, मोबाईल फोन आणि दुचाकी असा 86 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
दुसरी कारवाई
पिंपरी-चिंचवड: पिंपरी गाव येथे करण्यात आली. त्यात महावीर लिंबाराम भाटी (वय 25, रा. पिंपरीगाव. मूळ रा. राजस्थान) याला अटक केली असून त्याच्यासह सतीश माळी (रा. सांगवी), धनसाराम (रा. वाघोली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी भाटी याने एक दुचाकी आणि दोन कारमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून भाटी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन वाहने आणि प्रतिबंधित गुटखा असा एकूण 11 लाख 17 हजार 652 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.