- November 4, 2022
- No Comment
तीस टक्के व्याज वसुल करुन, आणखी पैशाची मागणी करत धमकी देणारा खाजगी सावकारवर गुन्हा दाखल
पुणे: मुलाची शाळेची फी भरण्यासाठी 30 टक्के व्याजाने पैसे घेऊन ते परत केल्यानंतर आणखी पैशाची मागणी करत धमकी देणाऱ्या खाजगी सावकारासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
बिलाल इसाक शेख (वय 26, रा. डॉल्फिन चौक बिबेवाडी) शेहनाज शेख यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील बिलाल इसाक शेख याला अटक करण्यात आली. सुनील बाळासाहेब धुमाळ (वय 40) यांनी याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने बिलाल शेख याच्याकडून तीस टक्के व्याजाने 29 हजार पाचशे रुपये घेतले होते. या पैशाच्या बदल्यात जानेवारी 2022 पर्यंत त्याला 53 हजार 990 रुपये दिले होते. मात्र आरोपीने फिर्यादीकडे आणखी एक लाख वीस हजार रुपयाची मागणी केली. हे पैसे वसूल करण्यासाठी काही गुंड त्याच्या घरी पाठवले.
या गुंडांनी फिर्यादीच्या घरात बळजबरीने प्रवेश करत बिलाल शेख याचे पैसे दिले नाहीत तर तुला उचलून घेऊन जाऊन कुठे मारून टाकू कळणारही नाही अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीला बोलावून डॉल्फिन चौकात जबरदस्तीने त्यांच्याकडून चाळीस हजार रुपयांचा चेक घेतला. तसेच आरोपी बिलाल शेख यांचा भाऊ तुरुंगातून सुटल्यानंतर गायब करण्याची धमकीही दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.