- November 7, 2022
- No Comment
लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाला २२ लाखांना घातला गंडा
पुणे: हॉटेल व्यावसायासाठी लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची २२ लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. लोन करण्यासाठी मॅनेजरला पैसे द्यावे लागतील, असे सांगून पैसे उकळले आहेत.
याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात धनेश कुताळ (वय ४१) यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार, राजेंद्र गोसावी (वय ३८), फिरोज खलील शेख (रा. कॅम्प) व अब्बास शबीर भोरी (वय ३९, रा. रविवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांना हॉटेल व्यावसायिसाठी पैशांची आवश्यकता होती. या तिघांनी लोन मिळवून देतो, असे सांगितले. त्यांना लोनसाठी बँक मॅनेजरला पैसे द्यावे लागतील असे सांगितले होते. दरम्यान त्यांनी तक्रारदार यांच्या फॉर्च्युनर कारची कागदपत्रे घेतली. ती कार गहाण ठेवून खासगी व्यक्तीकडून १० लाख रुपये कर्ज घेतले. त्याबाबत महिन्याला १ लाख रुपये व्याज भरण्यास देखील त्यांना सांगितले. पुन्हा त्यांना बँकेतून २ कोटी १० लाख रुपये कर्ज मंजूर करून देतो, असे सांगत प्रथम साडे सहा लाख रुपये घेतले. तर, लोन मंजूर झाल्याची बनावट कागदपत्रे इमेलद्वारे पाठविली. त्यानुसार परत रोख स्वरूपात साडे बारा लाख रुपये घेतले. पण, त्यांना लोन मिळवून न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणीकरत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.