- November 16, 2022
- No Comment
अवैध धंद्यावर मोठी कारवाई,आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देहुरोड, निगडी व वाकड येथे धंद्यावर कारवाई करत तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड आयुक्तायलयाची गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागाच्या पथकांनी केली. ज्यामध्ये जुगारअड्डा, व्हिडीओ गेम पार्लर व वेश्या व्यवसाय या अवैध धंद्याचा समावेश आहे.
पहिल्या कारवाईमध्ये निगडी येथे एका लॉटरीच्या दुकानावर छापा मारत पोलिसांनी 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (दि.15) निगडी येथील पवळे पुलाजवळील बसस्टॉपच्या मागे असणाऱ्या जयप्रकाश मार्केट येथे केली.
यामध्ये पोलिसांनी सचिन शंकर रोमन, विजय शंकर रोमन, रितेश अशोक केशवानी (तीघे रा. निगडी), आनंद प्रसाद (रा. चिखली), केतन उर्फ बंटी बदाम मुसळे (रा. वाल्हेकरवाडी) याना अटक करून त्यांच्याविरोधात बेकायदा जुगार खेळल्याचा गुन्हा दाखल केला. याबरोबरच पोलिसांनी 26 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 26 व्हिडीओ गेम मशीन, 7 एलईडी टि.व्ही, रोख रक्कम व फोन, इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 6 लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहे.
दुसऱ्या कारवाईमध्ये देहुरोड पोलीस ठाणे हद्दीत दोन व्हिडीओ गेम पार्लवर पोलिसांनी छापा मारला आहे. ज्यामध्ये साई व्हिडीओ गेम पार्लर चालक समीर शेख (रा, देहुगाव), गणेश खंडेलवाल व इतर दोन साथीदारांना अटक केली आहे. तसेच जय मातादी व्हिडीओ पार्लरवर छापा मारत चालक हरीश तिटकरे ( रा. किवळे) याच्यावर कारवाई करत दोघांना अटक केली आहे.सर्व आरोपींवर देहुरोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्या अतंर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून 13 व्हिडीओ गेम मशीन,रोख रक्कम व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तिसऱ्या कारवाईत पोलिसांनी वाकड पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिला आरोपीला अटक करून तिच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका केली.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरात वाढणाऱ्या अवैध धंद्या विरोधात ही विशेष कारवाई करण्यात आली ज्यामध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या विविध डिपार्टमेंटचे सात पोलीस निरीक्षक, पाच सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 40 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.