- November 16, 2022
- No Comment
सासऱ्याला लाचलुचपत विभागाच्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार्या जावयावर गुन्हा दाखल
सांगवी: पत्नीला पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 15 लाख रुपयांची मागणी केली. पत्नीने नकार दिला असता थेट पोलीस सासऱ्याला लाचलुचपत विभागाच्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जावई व त्याच्या कुटुंबावर व मित्रावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2013 सालापासून आज अखेरपर्यंत पिंपळे गुरव येथे घडत होता.
याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती प्रमोद जनार्धन लांडगे, सासरे जनार्धन लांडगे, चार महिला आरोपी, दिर प्रवीण लांडगे, विजय हनुमंत रंदिल व प्रमोद याचा एक मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच, त्याने फिर्यादी यांना पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 15 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी केली. त्याला नकार देताच कुटुंबातील इतर सदस्यांनीही पिडीतेला शिवीगाळ व हाताने मारहाण करत छळ केला. त्यानंतर आरोपीने त्याच्या मित्राच्या सहाय्याने फिर्यादीचे वडील जे पोलीस खात्यात कार्यरत आहेत, त्यांना लाचलुचपत विभागाकडून ट्रॅप लावून गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.