- November 16, 2022
- No Comment
कीरकोळ वादातुन वेटरचा खून,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड मध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. मटण सूपमध्ये भाताचे कण आढळल्याने दोन मित्रांनी मिळून 4 वेटरला मारहाण केली असून यामध्ये एका वेटरचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री पिंपळे सौदागर येथील सासुरवाडी हॉटेलमध्ये घडली.
मंगेश कोस्ते असे मृत वेटरचे नाव असून त्याचे वय 19 वर्ष होते. तो मुळचा जालना येथे राहणारा होता. अजित अमूत मुठकुळे (वय 32), सचिन सुभाष भवर (वय 22) अशी जखमी वेटरची नावे आहेत. विजयराज वाघिरे आणि त्याचा साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल महादू रजाळे यांनी सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सुनिल तांबे म्हणाले की, ‘काल रात्री दोन मित्र जेवण करण्यासाठी पिंपळे सौदागर येथील सासुरवाडी हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी मटण सूप मागवले. सूपमध्ये भाताचे कण आढळल्याने त्या दोघा मित्रांमधील एकाला राग आला. त्यामुळे वेटर व त्याच्यामध्ये जोरदार भांडण झाले व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.’ रागीट मित्राने त्याच्या गाडीतून लाकडी दांडका आणला आणि वेटरच्या कानाच्या मागे डोक्यावर घाव घातला. यात जबर दुखापत झाल्याने या वेटरचा मृत्यू झाला. इतर 3 वेटरने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांनाही मारत होता. मारहाणीत या तीन वेटरला किरकोळ जखमा झाल्या आहेत.