- November 22, 2022
- No Comment
कर्तव्यात कसूर करणाऱ्या चतु:शृंगीच्या वरिष्ठ निरीक्षकांसह तिघांवर कारवाई
पुणे: पुण्यातील श्वेता रानवडे हत्याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तिघांवर कारवाई करण्यात आली. चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
तर महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली ईश्वर सूळ यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक शामल प्रकाश पवार पाटील यांची देखील चतु:शृंगी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली सुळ या कार्यरत असताना श्वेता रानवडे या तरुणीने सप्टेंबर महिन्यात प्रतीक ढमाले याच्या विरोधात तक्रार दिली होती. लग्न करण्यासाठी तो दबाव टाकत होता. श्वेता रानवडे या तरुणीला तो वारंवार त्रास देत होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिने पोलिसांना दिलेल्या अर्जात केली होती. वैशाली सुळ यांच्याकडे या तक्रार अर्जाची चौकशी देण्यात आली होती. मात्र, सुळ यांनी तक्रार अर्ज गांभीर्याने घेतला नाही. परिणामी आरोपी प्रतीक ढमाले याने श्वेता रानवडे या तरुणीचा खून केला.