- November 23, 2022
- No Comment
मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या तीन पोलिसांचे निलंबन
पुणे: पुणे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या तीन पोलीस अंमलदारांनी सोमवारी रात्री मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये दारूच्या नशेत धिंगाणा घातला होता. दारू देण्यास नकार दिल्याने हॉटेल मॅनेजरला मारहाण केली होती.
याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशावरून अपर पोलीस आयुक्त डॉक्टर जालिंदर सुखकर यांनी या तिघांच्या निलंबनाचे आदेश काढले.
चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस आमदार योगेश भगवान गायकवाड, फरासखाना पोलीस ठाण्यातील अंमलदार उमेश मरीस्वामी मठपती आणि पुणे वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस नाईक अमित सुरेश जाधव अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या तिघांविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सार्वजनिक ठिकाणी मध्य प्राशन करून पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणे, बेजबाबदारपणा, बेशिस्त आणि बेफिकिरी करून गैरवर्तन करणे असा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.