- December 4, 2022
- No Comment
मुंढव्यातील सराईत नागपुरे टोळीवर ‘मोक्का’
पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार योगेश नागपुरे याच्यासह त्याच्या 6 साथीदारांवर मोक्का कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत 112 आणि चालु वर्षात 49 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख योगेश प्रकाश नागपुरे (वय-35) टोळी सदस्य प्रमोद अजित साळुंखे (वय-25 रा. लेन नं.1, खराडी, पुणे), वाजीद अश्पाक सय्यद (वय-2 रा. क्रांतीपार्क, खराडी), मंगेश बाळासाहेब तांबे (वय-28 रा. खराडकर पार्क, खराडी), लक्ष्मणसिंह उर्फ हनुमंता छत्तरसिंग तंवर (वय-35 रा. एच.एम.एस. हेवन बिल्डींग, मांजरी, पुणे) आणि एक महिला यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
आरोपी प्रमोद साळुंखे याने पत्रकार असल्याचे सांगून एका व्यावसायिकाला त्यांच्या गोडाऊनमध्ये भेसळयुक्त अन्न धान्याची विक्री करता असे सांगून गुटख्याची विक्री करुन खुप पैसे कमावले आहेत. पेपरमध्ये तुमच्या विरोधात बातमी लावून बदनामी करण्याची धमकी देऊन पैसे दिले नाहीतर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच व्यावसायिकाच्या मुलाला मारहाण करुन पत्नी व मुलाला गोडावूनमध्ये डांबून ठेवत 5 लाखाची खंडणी वसुल केली. याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात आयपीसी 384,387, 341, 452, 506, 323, 120 (ब), 143 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात चार जणांना अटक करण्यात आली असून टोळी प्रमुख योगेश नागपुरे आणि महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.
सराईत गुन्हेगार योगेश नागपुरे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने खडक, मुंढवा, हडपसर, बंडर्गाडन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले आहेत. आरोपींविरुद्ध खूनाचा प्रयत्न, खंडणी, मानवी तस्करी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,
अपर पोलीस आयुक्त (पूर्व) नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे,
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे, सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस अंमलदार हेमंत झुरुंगे,
नाना भांदुर्गे, दिपक कांबळे यांनी केली.