- December 5, 2022
- No Comment
कंपनीत गुंतवणुकीच्या बहाण्याने पावणे नऊ लाखांना घातला गंडा
नवी सांगवी: इझी लाईफ 18 नावाच्या कंपनीने ऑनलाईन माध्यमातून गुंतवणूक केल्यास भरपूर फायदा होईल, असे आमिष दाखवून सुरुवातीला कमी गुंतवणुकीवर नफा दिला. संबंधित व्यक्तीला अधिक रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून व्यक्तीची 8 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना नवी सांगवी येथे घडली.
प्रवीण श्रीरंग शिंदे (वय 40, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 3) सांगवी पोलीस ठाण्यात इझी लाईफ 18 नावाच्या कंपनी विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण यांना ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे आमिष दाखवून सोशल मीडियावरून संपर्क करण्यात आला. प्रवीण यांनी सुरुवातीला सात हजार रुपये, त्यानंतर 33 हजार रुपये गुंतवणूक केली. त्यावर त्यांना चांगला नफा मिळाला. त्यानंतर आरोपींनी प्रवीण यांना अधिकाधिक रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीला दोन वेळी पैसे आणि नफा परत मिळाल्याने प्रवीण यांनी 1 लाख 30 हजार रुपये गुंतवले.
त्यानंतर आणखी दोन टप्प्यात रक्कम गुंतवली. मात्र समोरची व्यक्ती आणखी गुंतवणूक करण्यास सांगत असल्याने प्रवीण यांना संशय आला. त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली असता त्यांना ती रक्कम न देता त्यांची 8 लाख 75 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.