- December 10, 2022
- No Comment
पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातील अधिकाऱ्याला मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे: जप्ती वॉरंट सह मिळकत सील करण्यासाठी गेलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातील अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मार्व्हेल प्रमोटर आणि डेव्हलपर्सचे लीगल ॲडव्हायझरवर जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी वसंत हरिभाऊ सुतार (वय 57) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे महानगरपालिकेत कर आकारणी आणि कर संकलन विभागात प्रशासन अधिकारी म्हणून कर्तव्यास आहेत. आरोपीच्या मोकळ्या जागेची मिळकत कर थकबाकी पोटी 1 कोटी 59 लाख 46 हजार रुपये इतकी थकबाकी आहे. त्यांना वारंवार मिळकतकर नोटीस जप्ती वॉरंट बजावण्यात आले. लोक अदालत नोटीस वारंवार बजाऊन देखील ते मिळकत कर भरण्यास सतत टाळाटाळ करत होते.
त्यामुळे फिर्यादी यांनी कोरेगाव पार्क येथील लेन नंबर पाच येथील ज्वेल हाऊस येथील तिसऱ्या मजल्यावरील 301 आणि 302 या ऑफिसवर मनपाच्या जप्ती वॉरंट सह मिळकत सील करण्यासाठी/ मिळकतीचा, थकबाकीचा रक्कम चेक वसूल करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी जावेद शेख यांनी त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तुमच्या नोकऱ्या घालवितो, तुला गायब करतो अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.