- January 6, 2023
- No Comment
अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक
पुणे : येरवडा भागात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून २० लाख रुपये किंमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले.
अफजल इमाम नदाफ (वय २६, रा. सोलापूर), अर्जुन विष्णू जाधव (वय ३२, रा. लोणावळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येरवडा भागात अमली पदार्थ विरोधी पथकाचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी संगमवाडी परिसरात दोघे जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून २० लाख रुपये किंमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

आरोपी अर्जुन जाधव याच्या विरोधात पोलिसांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी त्याने जामीन मिळवला हाेता. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा अमली पदार्थांची विक्री सुरू केली. जाधव आणि नदाफ यांनी मुंबईतून मेफेड्रोन आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, मनाेज साळुंखे, मारुती पारधी, विशाल दळवी, राहुल जोशी, संदीप शिर्के आदींनी ही कारवाई केली.